मुंबई | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला त्यांना आता लगोलग काँग्रेसमध्ये प्रवेश नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्या ठिकाणी नवीन आणि दमदार कार्यकर्ते आणि पदाधिकारी तयार झाले आहेत, असं थोरात म्हणाले.
तयार झालेल्या नवीन कार्यकर्त्यांना विचारूनच पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात परत प्रवेश दयायचा की नाही हे ठरवलं जाईल, असंही थोरात यांनी सांगितलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून तूर्तास तरी गयारामांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही, असंच मानलं जातंय.
निकाल लागल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता आहे का? किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना जेवढी भरती तेवढीच मोठी ओहोटी, हा तर निसर्गाचा नियम आहे, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे भाजपमध्ये होणाऱ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, पक्ष सोडून गेलेले नेतेअत्यंत अस्वस्थ आहे. वारे फिरेल तसे फिरणारे हे नेते संधीसाधू आहेत, असा टोलाही त्यांनी राधाकृष्ण विखे यांना लगावला आहे.
