रत्नागिरीत रविवारी दुस-या सायक्लोथॉनचे आयोजन

0

रत्नागिरी : गेल्या वर्षीच्या पहिल्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. ८ डिसेंबर) दुसरी सायकल फेरी अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. ‘सशक्त रत्नागिरी प्रदूषणमुक्त रत्नागिरी’ हे ब्रीद घेऊन आता रत्नागिरीकर सायकलवर स्वार होणार आहेत. यानिमित्ताने अनेक संस्था वीरश्री संस्थेसोबत जोडल्या गेल्या असून रत्नागिरी या सायक्लोथॉनसाठी सज्ज झाली आहे.

रत्नागिरी सुंदर शहर आहे ते तसेच राहावे, त्याचवेळी रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम राहावे या भावनेतून वीरश्री ट्रस्टच्या वतीने गेल्यावर्षी पहिल्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सायकल फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच सायकल क्लबची स्थापना झाली. सायकल ही अनेकांच्या दैनंदिन जीवनातची भाग बनली. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण आता नियमित सायकल चालवतात. यंदा दुसऱ्या ‘सायक्लोथॉन’ आयोजन करण्यात आले आहे.

येत्या रविवारी रत्नागिरीतील शिवाजीनगरच्या आठवडा बाजारातून स्पर्धेला सुरुवात होईल. सकाळी साडेपाच वाजता नोंदणी करायची आहे. ठीक ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. तेथून मारुतीमंदिर – जयस्तंभ – शनिवार आठवडा बाजार – भगवती मिरकरवाडा जंक्शन – मिरकरवाडा – रेमंड्स रेस्ट हाऊस – भारती शिपयार्ड आणि परत असा फेरीचा २४ किलोमीटरचा मार्ग आहे. सहभागी सायकलपटूंना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ज्यांनी फेरीसाठी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाचपूर्वी येऊन नोंदणी करावी आणि भाग घ्यावा. मात्र मेडल आणि प्रमाणपत्र देताना आधी नोंदणी केलेल्यांना दिले जाणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २२१२८२ आणि ९५२७०४४९०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here