मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिामित्त चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला होता. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जत्थेच्या जत्थे चैत्यभूमीकडे मार्गकर्मण करत असल्याचे दिसून येत होते. ही लाखोंची गर्दी म्हणजे, अनेक वर्षांपासून न चुकता चैत्यभूमीवर येणार्यांसह, पहिल्यांदाच चैत्यभूमी गाठलेले तरुण चेहरे, ‘शिका आणि संघटित व्हा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या शिकवणीचा आदर्श आतापासूनच रुजू घातलेली भावी पिढी यांचा एकत्रित संगम असल्याचे चित्र होते. झेंडे, फिती, बिल्ले, स्टिकर्स कौतुकाने छातीवर परिधान करत ‘जय भीम’चा नारा देत लाखोंचा जनसमुदाय बाळासाहेबांनी भारतीय राजकारण, संविधानासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत आहेत. याचवेळी शिवाजी पार्क परिसरात राज्यातील विविध भागांतून प्रकाशक, नव्या दमाचे लेखक यांनी आपल्या पुस्तकांचे स्टॉल लावले आहेत. यामध्ये कला, साहित्य, विपशयना, धम्म या विषयांसह पुरोगामी विचार, चळवळ तसेच स्पर्धा परीक्षा, महापुरुषांची चरित्रे इ. पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. चैत्यभूमीजवळील विविध भागात अनेक शाहीर, कवींनी बाबासाहेबांच्या योगदानावर रचलेल्या कविता, पोवाडे सादर करत जनजागृतीची परंपरा कायम राखताना दिसते आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 22 वर्षे जिथे वास्तव्य केले ते परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ क्र. 1 मधील खोली क्रमांक 50 व 51 या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे 1912 ते 1934 असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महामानव म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या जीवनात या वास्तूचे खूप महत्त्व होते. बीआयटी चाळ क्रमांक 1 मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा एतिहासिक वास्तूरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आज हा निर्णय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मागणीची पुर्तता केली.
