नवी दिल्ली – उन्नाव येथील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्क्यांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.
उन्नाव बलात्कार घटनेतील पीडीत मुलीला पाच जणांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या तरुणीवर गेल्या डिसेंबरमध्ये बलात्कार झाला होता. याच प्रकरणात जामिनावर सुटलेल्या दोघांसह पाच जणांनी हा हल्ला केला. रायबरेली येथील कोर्टात जात असताना तिच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकण्यात आला. त्यामध्ये ही पीडीत तरुणी 90 टक्के भाजली होती. उपचार सुरू असतानाही पीडितेने धीर सोडला नव्हता. ‘उपचारादरम्यान मी वाचेन ना, मला जगायचे आहे.’ असे पीडित तरुणी म्हणत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याआधी गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुद्धीत असताना आपल्या भावाला तिने सांगितलं की, आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यांना सोडू नको. परंतु, आज अखेर तिची झुंज अपयशी ठरली.
दरम्यान, हरिशंकर त्रिवेदी, राम किशोर त्रिवेदी, उमेश बाजपेयी, शिवम आणि शुभम त्रिवेदी अशी तिच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. या पाचही जणांना अटक करणार आहेत, असे पोलिस परिमंडळ अधिकारी गौरव त्रिपाठी यांनी उन्नाव येथे सांगितले.
