दाभोळ : दापोली तालुक्यातील वेळवी येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळवी येथील आदिवासी वाडीमधील एक महिला आपल्या १४ वर्षीय मुलगी आणि तिच्या १३ वर्षीय मैत्रीणीसह ४ डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास जंगलात हरडे गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी ही महिला चालत पुढे गेली व मुली मागेच राहिल्या होत्या. वेळवी येथील मनोहर दळवी यांच्या दुकानासमोरुन जात असताना अज्ञात तीन तरुणांनी या दोन अल्पवयीन मुलींना रिक्षातून फुस लावून पळवून नेल्याची तक्रार या महिलेने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीनुसार तीन संशयितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद झगडे करत आहेत.
