खेड, ता. ९ : सोने व्यावसायिकाला तलवारीचा धाक दाखवून २५ लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या चौकडीला खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ७ डिसेंबरला खेड तालुक्यातील दहीवली गाव परिसरातील जंगलामध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील सोने व्यावसायिक नितीन सागवेकर यांना पैसे देण्याच्या बहाण्याने जितेश घाग, नितीन मोरे, सचिन जाधव व महेश शेलार या चौघांनी दहीवली येथे बोलावले होते. सागवेकर दहीवली येथे गेले असता त्यांना जबरदस्तीने दहीवली- ओमळीगावच्या हद्दीत असलेल्या जंगलमय भागात नेण्यात आले. या ठिकाणी त्यांना तलवारीचा धाक दाखवून हॉकी स्टीक व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. चौघांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत सागवेकर यांनी पोलिस स्थानक गाठले. खेड पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चौघांच्याही मुसक्या आवळल्या. खेड पोलिस तपास करत आहेत.
