दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी दोषी आरोपी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ताला मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात नेण्यात आले आहे. तसेच तिहारमध्ये त्यांच्या फाशीची ट्रायल देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हैदराबाद सामूहिक बलात्कारात चार आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा याने फाशीपासून सूट मिळावी, यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली. त्यानंतर या सर्व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाली आहे. त्यामुळे आता येत्या १६ डिसेंबरला त्यांना फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर भयंकर अत्याचार केले होते.
बलात्कारानंतर अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. बस चालक राम सिंह या दोषीने ट्रायलदरम्यान तुरुंगातच आत्महत्या केली. उरलेल्या या चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर तरी न्याय मिळावा अशी शक्यता आहे.
