चिपळूण : तालुक्यातील मोरवणे धरणाला कोणताही धोका नाही, असे पत्र लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ए. सोनावणे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. धरणामधून गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर घबराट निर्माण झाली होती. मात्र, आता अधिकार्यांच्या पत्रामुळे भीती दूर झाली आहे. गुरुवारी सकाळी 11 वा. मोरवणे येथे ग्रामस्थांची बैठक झाली. या तहसीलदार जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सोनावणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी धराच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थिथत केले. गळतीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार देसाई यांनी धरणाखालील लोकांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यामुळे या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या अनुषंगाने गुरुवारी ग्रामस्थांबरोबर बैठक घेण्यात आली. यावेळी उपअभियंता सोनावणे यांनी, धरणाच्या बांधकामाबाबत माहिती दिली. धरणाच्या भिंतीमधून गळती नसून ही गळती अन्य ठिकाणाहून आहे. त्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. सध्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भिंतीवरील पाण्याचा दाब कमी करण्यात आला आहे. या शिवाय तत्काळ दखल घेऊन भिंतीवर वापरणार झाडेझुडपे तोडण्यात आली आहेत. मात्र, ग्रामस्थांचे या म्हणण्याने समाधन झाले नाही. यावेळी उपस्थितांनी लेखी हमी मागितली. यावर आपण धरणाची पाहणी केली असून शासनाला लेखी अहवाल दिला आहे. त्यामध्ये धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी लेखी पत्राचा आग्रह धरल्याने धरणाला धोका नसल्याचे लेखी पत्र दिले. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
