नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत ते सादर केलं जाणार आहे. मात्र या विधेयकाविरोधात देशभरातून आंदोलने होत आहे. देशातील 727 प्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात पत्र लिहिलं आहे. माजी न्यायाधीश, वकील, लेखक, अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यात जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांनी केंद्र सरकारला नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण दृष्टीकोनाचा भंग करत आहे. आम्ही हे विधेयक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समुदायांचे विभाजनशील, भेदभाव करणारं आणि असंवैधानिक असल्याचं मानतो आणि यामुळे भारताच्या लोकशाहीला नुकसान पोहोचेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे संविधानाला धोका आहे. यासाठी आम्ही सरकारला हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.