तिजोरीला मोठा खड्डा! रोहित यांची भाजपवर टीका

0

राज्यावर जवळपास ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रस्त्याची दुरवस्था तशीच आहे, मात्र तिजोरीला मोठा खड्डा पडला असल्याची टीका त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या खड्डे बुजवण्याच्या घोषणेचा समाचार घेतला आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक घोषणा केली होती की, यापुढे राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा करून आता एक वर्ष होत आले आहे, रस्त्यावरचे खड्डे तर बुजलेले नाहीतच, पण या सरकारने राज्याच्या तिजोरीला मात्र मोठा खड्डा पाडला आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आज राज्यावर जवळपास ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, सरासरी हिशेब केला तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ५४ हजार रुपयांचा बोजा पडला आहे. मला मान्य आहे की, राज्याचा कारभार चालवताना कर्ज काढण्याची गरज भासू शकते, आघाडी सरकारच्या काळात देखील कर्ज काढले होते, पण त्या काळात काढलेल्या कर्जातून होणारी कामे आपणा सर्वाना दिसत होती. आज समस्या हीच आहे की, गेल्या पाच वर्षात कर्जे तर भरमसाट काढली गेली; परंतु त्यामुळे ना शेतकरी कर्जमुक्त झाला, ना युवकांना रोजगार मिळाला, रस्त्यावरचे खड्डे देखील बुजवले गेले नाहीत, मग ही रक्कम नेमकी गेली कुठे? असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here