लोककलेतून होणार कोरोना जागृती, राज्य सरकारचा निर्णय

0

मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा लोककलावंतांचा प्रश्न समोर आला आहे. एकीकडे पहिल्या लाटेनंतर सगळं नव्याने सुरू होता होता गोष्टी थांबल्याने लोककलावंतांसमोर मोठी अडचण उद्भवली आहे. आता याच अडचणीवर राज्य सरकारने उपाय शोधून काढला आहे. लोककलावंतांकडे असलेल्या कलेचा उपयोग कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी होणार आहे. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

लोककलेनं नेहमीच लोकरंजनासोबत जागृतीचं काम केलं. अनिष्ट प्रथांविरोधात लोककलेतून आसूड ओढण्यात आला. आता हीच लोककला कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, माहीती व जनसंपर्क आदींनी मिळून विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. या बैठकीला अभिनेता सुबोध भावेही उपस्थित होता. सुबोध एबीपी माझाशी बोलताना म्हणाला, ‘लोककलावंतासमोर आता चरितार्थासाठी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर विचार करताना या लोककलावंतांचा वापर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये कोरोना जागृतीसाठी करता येईल यावर एकमत झालं. त्यानुसार एकल कलावंत जे आहेत ते हे काम करतील. गावातल्या चावडीपाशी.. किंवा वाडीतल्या चौकात जाऊन हा कलाकार आपली कला सादर करेल. त्या कलेतून तो कोरोनाशी लढताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दल सांगेल. त्याच्यासोबत प्रशासनाचा एक माणूसही असेल. त्याच्या अटी-नियम जीआरमध्ये दिलेल्या आहेत. दुपारी 4 ते 6 या वेळेतच तो ही आपली कला सादर करेल. अशा एकल कलावंतांची यादी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे आहे. ती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाईल. त्यानंतर त्या त्या एकल कलावंतांनी दिलेला विषय घेऊन सादरीकरण करायचं आहे.’ जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सतत मास्क लावणे, तो योग्य पद्धतीने लावणे, हात धुणे, सॅनिटायझर लावणे, अंतर राखणे.. आदी अनेक विषय यात घेण्यात आले आहेत. वृद्धांनी, लहान मुलांनी घ्यायची काळजी, सरकारची कोरोनाविषयक असलेली नियमावली आदीं विषय घेता येणार आहेत. त्या त्या गावचा ग्रामसेवक, शाळेचा मुख्याध्यापक हा त्या एकल कलावंतांसोबत असेल. कार्यक्रम झाल्यावर तो अधिकारी संबंधित कलाकाराला प्रमाणपत्र देईल. त्या प्रमाणपत्राच्या आधारे कलाकाराला मानधनाची मागणी करता येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here