भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही ५० वी मोहीम होती. RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. सीमेवरील चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येईल.