मुरगाव येथे हिंदुस्थान-रशिया दरम्यानच्या ‘इंद्रा’ला सुरुवात

0

रशियन फेडरेशन नेव्हीची तीन जहाजे ‘इंद्रा-2019’ (INDRA-2019) मध्ये भाग घेण्यासाठी मुरगांव पत्तन न्यासाच्या बंदरावर दाखल झाली आहेत. 10 ते 19 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या हिंदुस्थान व रशिया सैन्य दलाच्या संयुक्त त्रि-सेवा सरावाची ही दुसरी आवृत्ती आहे. सामान्य सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे सोडविण्यासाठी आंतर-कार्यक्षमता वाढविणे तसेच परस्परांतील समज विकसित करणे, हे या सरावाचे उद्दीष्ट आहे. हिंदुस्थानी आणि रशियन फेडरेशनच्या नौदलादरम्यान द्विपक्षीय नौदल अभ्यासाच्या रूपात ‘इंद्रा’ची 2003 ला सुरुवात झाली. यावर्षी हा सराव दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला आहे. यातील पहिला टप्पा 10 ते 15 डिसेंबर दरम्यान मुरगांव बंदरावर तर दुसरा टप्पा 16 ते 19 डिसेंबर दरम्यान अरबी समुद्रात पार पडेल. व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक भेटी, क्रीडा साहाय्य आणि सहभागी जलवाहिनीचे ध्वज अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात औपचारिक संवाद असे पहिल्या टप्प्याचे स्वरूप आहे. समुद्रावरील हवाई संरक्षण, कवायत, पृष्ठभागावरील गोळीबार व इतर सामरिक कार्यपद्धती इत्यादी दुसऱ्या टप्प्यातील विषय असतील. हिंदुस्थानी नौदलाचे प्रतिनिधीत्व आयएनएस आदित्य, फ्लीट सपोर्ट शिप आणि आयएनएस तारकश हे करतील. याव्यतिरिक्त, डोर्निअर आणि पी8आय मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट, मिग 29 के फायटर एअरक्राफ्ट तसेच इतर इंटिग्रल रोटरी विंग हेलिकॉप्टर्स या सरावात भाग घेतील. हिंदुस्थानी सैन्य दल 18 डिसेंबर रोजी समारोप सत्रात ‘घातक प्लाटून’ मैदानात उतरणार आहे, तर हिंदुस्थानी वायुसेनेतर्फे एसयू30 एमकेआय, जग्वार, एमआय 17 हेलिकॉप्टर्स आणि एअरबोर्न चेतावणी व नियंत्रण प्रणाली (AWACS) विमान सहभागी होणार आहेत. त्रि-सेवा एक्स इंद्रा 2019 हे परस्पर आत्मविश्वास व कार्यक्षमता आणखी मजबूत करण्यास आणि दोन्ही देशांच्या सशस्त्र सैन्यामधील सामायिकरण सक्षम करण्यास मदत करेल. सुरक्षा सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने हा सराव आणखी एक मैलाचा दगड ठरेल आणि हिंदुस्थान-रशियामधील दीर्घकालीन मैत्रीसंबंधास बळकटी देईल.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here