मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे तयार करण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून रात्र-दिवस सुरू असलेल्या कामामुळे आगामी काही दिवसात भुयारी मार्ग पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या कामामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. भरणे परिसरातील संपादित जागांवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. महामार्गावर अडथळा निर्माण केल्यास दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची तंबी, रितसर सूचना फलक लावून पेण येथील राष्ट्रीय महामाग्र विभागाने देताच साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. या तंबीचा धसका घेत अनेकांनी संपादित जागेत असलेली वाढीव बांधकामे तोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापुढे कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता संपादित जागांवरील बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे संकेतही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहेत. भरणे येथून चारही दिशांना वाहने धावतात. विशेषतः आंबवलीच्या दिशेने जाण्यासाठी भरणे येथील मुख्य जंक्शनवर भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या भुयारी मार्गाच्या खोदाईचे काम देखील ठेकाधारक कंपनीने युध्दपातळीवर हाती घेतले आहे. या खोदाईसाठी तीन पोकलेन, दोन जेसीओ व तीन मालवाहू ट्रकची उपलब्धता करण्यात आली आहे. खोदाईसाठी यंत्रणांची दिवस-रात्र घरघर सुरू आहे. परिसरातील चौपदरीकरणापूर्वी भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्यास दिसून येत आहे.