नटसम्राट काळाच्या पडद्याआड ! मान्यवरांची डॉ. श्रीराम लागू यांना आदरांजली

0

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने एका नाट्यपर्वाचा असत झाला असून विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. लागू यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

HTML tutorial

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. ‘झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ नेते शरद पवार- वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे. डॉ. लागू हे अभिनय जगतातील ‘सिंहासन’ होते. या ‘कलेच्या चंद्रा’ने ‘सामना’, ‘पिंजरा’ असे अनेक चित्रपट गाजवले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे,

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ लागू यांना विनम्र श्रद्धांजली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर- डॉ. लागू यांच्या जाण्याने एका चतुरस्त्र अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. डॉ. लागू यांनी मराठी नाट्यक्षेत्र आणि रजतपटावर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला होता. सामाजिक चळवळीमध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण आदरांजली

खासदार सुप्रिया सुळे- डॉ. श्रीराम लागू यांनी पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी आयुष्यभर जपली. रंगभूमी, चित्रपट या क्षेत्रांत त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर- मराठी रंगभूमीला सुवर्णकाळापर्यंत घेऊन जाणारे जे दिगग्ज होते त्यात डॉ श्रीराम लागू यांचं व्यक्तिमत्त्व प्रचंड मोठं होतं..माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांचा मला अतिस्नेह लाभला हे माझे मोठे भाग्य म्हणायला पाहिजे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून नाटक, अभिनय नाही तर अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या…आयुष्याबद्दल वेगळा दृष्टिकोन देणारी शिकवण ज्या काही मोजक्या मंडळींनी दिली त्यात लागू यांचे नाव अग्रक्रमाने आहे..त्यांना सर्वार्थाने शांती लाभो…

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी- डॉक्टर हे विचारवंत नट होते. त्यांनी विचार आणि नाटक कधी एकमेकांपासून वेगळे मानले नाही. ज्या काळात रंगभूमीवर शैलीबद्ध अभिनयाचा पगडा होता त्या काळात डॉक्टरांनी आपल्या वास्तववादी अभिनयाने रंगभूमीला एक वेगळी दिशा दिली. शिस्तबद्ध आणि पुरोगामी विचार असलेले एक नाट्यपर्व आणि खऱ्या अर्थाने नटसम्राट व्यक्तिमत्वच आज आपल्यात नाही याचे दुःख आहे.

अभिनेता सुबोध भावे- सर्वार्थाने नाटकांवर प्रेम करणारा माणूस, मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे आदर्श श्रीराम लागू गेले याचे अतीव दुःख झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अभिनेता सुमित राघवन- डॉ. लागू हे माझे हॅम्लेट नाटक पाहण्यासाठी आले होते. त्यांनी तीन तास ते नाटक पाहिले. त्यानंतर मला आशीर्वाद दिले. त्यामुळे मी भरुन पावलो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here