रत्नागिरी – नवीन वर्ष स्वागताच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून आज सायंकाळपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. किनारी भागात जीवरक्षकांसह अतिरिक्त पोलिस कुमक तैनात केली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिस प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. याकरीता Mahatraffic App चा वापर करुन कोणत्याही व्यक्तीने संबंधित वाहनांचे फोटो अपलोड केले तरी त्यावरून मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात येणार आहे. थर्टी फस्ट रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रात्रीच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात जल्लोष करण्यात येतो. येथे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. पार्टीच्या आयोजकांना पोलिसांचा परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना पार्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 50 ठिकाणी नाकाबंदी केली जाईल. त्यात सर्व शहरांचा समावेश असणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
