इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरोघरी जाऊन करणार कोरोना चाचणी

0

रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर लंडन दौरा रद्द

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघ 2 जूनला लंडनसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही फायनल 18 ते 23 जून या कालावधीत होणार आहे, त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना 19 मे रोजी मुंबईत दाखल होण्यास सांगितले आहे. मुंबईत आठवडाभर बायो बबलमध्ये राहिल्यानंतर खेळाडू लंडन दौऱ्यासाठी रवाना होतील. पण, ज्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याचा लंडन दौरा रद्द, असे स्पष्ट संकेत बीसीसीआयनं दिले आहेत.

या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएलमध्ये केलेल्या चूका बीसीसीआयला टाळायच्या आहेत आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. बीसीसीआय त्यांची वैद्यकीय टीम प्रत्येक खेळाडूच्या घरी पाठवणार आहे. यावेळी खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात येईल. येत्या काही दिवसांत याला सुरूवात होईल, त्यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंच्या घरी RT-PCR कसोटी होणार आहे. लंडनला जाणाऱ्या संघातील 90 टक्के खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना पुढील तीन महिन्यांत कोरोनाचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. पण, भारतीय संघ पुढील तीन-साडेतीन महिने इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेथेच त्यांना दुसरा डोस दिला जाईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 12-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here