रत्नागिरी : शहरातील नाचणे येथे घरफोडी करून सुमारे ६२ हजार ६५० रुपयांचे दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या संशयितास ‘शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दीपक रमेश राठोड (वय २५, रा. राजवाडी, भगवतीजेटी जवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १८ ते १९ नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास नाचणे येथे घडली. अशोक दत्ताराम साटम (वय ६६, रा. नाचणे, रत्नागिरी) हे घर बंद करून ठाणे येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ६२ हजार ६५० सोन्याचे दागिने व रोख रक्कम डल्ला मारला होता. या प्रकरणी साटम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयित राठोड याला सोमवारी (ता. २३) अटक केली. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (ता. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
