रत्नागिरी :
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपने मोठी ताकद लावली असून उद्या (ता. 26) दुपारी एसटी बसस्थानकापासून मुख्य रस्त्यांवरून प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने, उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, भाजप प्रदेश सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांना दिली.
ही प्रचार फेरी दुपारी 3 वाजता सुरू होईल. ही फेरी एसटी बसस्थानकापासून राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौकमार्गे भाजप जिल्हा संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या तोफा 27 डिसेंबरला थांबणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे उमेदवार प्रचारात दंग आहेत. भाजपचे पारडे जड होण्यासाठी प्रचार फेरी उपयुक्त ठरेल आणि चंद्रकांत दादा येणार असल्याने ही पोटनिवडणूक जिंकू, असा दावाही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
