आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात त्यांनी स्त्रियांबद्दल वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यापूवी त्यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे, अस वक्तव्य केले होते.
आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. स्त्रियांबद्दल बोलताना त्यांनी मुलं नसणाऱ्या स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये भिडे नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांना गरोदर स्त्रियांचा अपमान करणारे वक्तव्य केले. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं भिडे म्हणाले.
राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून हिंदू समाज नपुंसक आहे असं म्हणत त्यांनी मुस्लीमांकडून राष्ट्रवादीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच “राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत,” असं भिडे म्हणाले.
