रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज दुपारी एसटी बसस्थानकापासून मुख्य रस्त्यांवरून फेरी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने, उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, भाजप प्रदेश सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांना दिली.
प्रचार फेरी दुपारी तीन वाजता सुरू होईल. ती एसटी बसस्थानकापासून राम आळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक मार्गे भाजप जिल्हा संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या तोफा २७ डिसेंबरला थांबणार आहेत. भाजपचे पारडे जड होण्यासाठी प्रचार फेरी उपयुक्त ठरेल आणि चंद्रकांत दादा येणार असल्याने ही पोटनिवडणूक जिंकू, असा दावाही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उभे करण्यासाठी भाजपने सुपारी दिल्याचा आरोप रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केला होता. त्याचा समाचार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा परूळेकर यांनी घेतला. महाराष्ट्रात सरकार येण्यासाठी भाजपशी गद्दारी करून भाजपला सरकारपासून दूर ठेवण्याची शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुपारी दिल्याचे आता उघड झाले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या निर्मितीच्या काळात आणि नंतर मंत्रिमंडळातील नियुक्तीसाठी सामंत यांचे मुंबईत दीर्घ वास्तव्य झाले होते. त्यावेळी सेना नेत्यांच्या झालेल्या चर्चांवरून त्यांना बहुधा रत्नागिरीतील सुपारीची कल्पना सुचली असावी, असेही परुळेकर यांनी म्हटले आहे. आमदारांच्या असल्या आरोपात काहीही तथ्य नसून भारतीय जनता पक्षाने दिलेला सुसंस्कृत, सुशिक्षित व कार्यक्षम तसेच जनतेच्या मनातील उमेदवार दीपक पटवर्धन यांचा विजय निश्चिदत आहे, असेही परुळेकर यांनी सांगितले.
