सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? – फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले

0

मुंबई – देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून CAA व NRC कायद्यावरून मोठा गदारोळ सुरु असून या कायद्याच्या विरोधात व समर्थनार्थ विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस मुंबई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास आदरांजली वाहण्याची परवानगी नाकारल्याबद्दल ठाकरे सरकार चांगलेच संतापले. ते म्हणाले, ‘आमच्या सारख्या शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना राज्यसरकार लोकमान्य टिळकांना आदरांजली अर्पण करण्याची परवानगी नाकारत आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना फडणवीस पुढे म्हणाले की, ‘या देशामध्ये एनआरसी कायदा भाजपने नव्हे तर काँग्रेसने आणला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आसाममध्ये एनआरसी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एनआरसी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द केले जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. देशामध्ये जे पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना मात्र या कायद्याद्वारे हाकलून देण्यात येईल. कालपर्यंत पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिकांना हाकलून देण्याची भाषा करणारी शिवसेना मात्र आता सत्तेपुढं लाचार झाल्याचं पाहायला मिळतंय.’

यावेळी बोलताना विधान परिषदेतील भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या देशभरातील नागरिकांचे आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी मी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार मानतो. या कायद्यामुळे इतर देशांमध्ये हिंसेचे शिकार होत असलेल्या हिंदूं बांधवांना स्वगृही परतता येणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here