दीपक पटवर्धन मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – प्रवीण दरेकर

0

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे व्यक्त केला.

HTML tutorial

दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आज श्री. पटवर्धन यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत आले होते. शहरातून निघालेल्या प्रचारफेरीनंतर ते हॉटेल विवेक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची ही पोटनिवडणूक मतदारांवर अन्याय करणारी आहे. शिवसेनेच्या आपल्या राजकारणापोटी जनतेला या निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यंत्रणेवर होणारा खर्च, लोकांचा फुकट जाणारा वेळ हे सारे नागरिकांना आवडलेले नाही. रत्नागिरी म्हणजे कोकणाचे नाक समजले जाते. रत्नागिरीत जे होईल, त्याचे पडसाद संपूर्ण कोकणामध्ये उमटत असतात. रत्नागिरी हे सुसंस्कृत शहर आहे. देशाच्या आणि राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनेही रत्नागिरी शहर महत्त्वाचे आहे. त्यामुळेच येथील नगरपालिकाही महत्त्वाची आहे. पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने चांगला, सुसंस्कृत असा चेहरा पटवर्धन यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून नागरिकांना दिला आहे. माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शहरात फिरत असताना पटवर्धन म्हणजे चांगला उमेदवार असल्याची भावना मतदारांमध्ये दिसली. साहित्याची, स्वातंत्र्यवीरांची परंपरा शहराला लाभलेली आहे. त्यामुळेच येथील मतदारही सुसंस्कृत आहेत. ते जबाबदारीने मतदान करतील आणि पटवर्धन यांना जनता मोठ्या मताने निवडून देईल, अशी खात्री वाटते.

पटवर्धन यांच्याविषयी मुस्लिम समाजामध्येही चांगले मत असल्याचे सांगून श्री. दरेकर म्हणाले की,. केंद्र सरकारने संमत केलेल्या सीएए कायद्यासंदर्भात मुस्लिमांमध्ये चुकीचा संदेश पसरविला गेला. मुस्लिमांच्या मतांच्या राजकारणासाठी विरोधक एकत्र झाले आहेत. मात्र मुस्लिमांच्या गैरसमजाचे निराकरण केले जात आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही, हे त्यांना पटवून दिले जात आहे. त्याला मुस्लिमांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील आणि कोकणीतल मुस्लिम इथल्या मातीशी जोडले गेलेले आहेत. रत्नागिरीतही मुस्लिम समाजात चांगले वातावरण आहे. त्याचा पटवर्धन यांना नक्कीच फायदा होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर दरेकर यांनी टीका केली. मराठी राजभाषेसारख्या महत्त्वाच्या विषयांना सरकार बगल देत आहे. त्यांची करणी आणि कथनी वेगळी आहे. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणावरही या सरकारकडून अन्याय होत आहे. या साऱ्याचा विचार रत्नागिरीतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत मतदार करतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here