”कोकणी माणसाकडे संकटावर मात करण्याची जिद्द, पण सरकारकडे धोरणच नाही”

0

पुणे : लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे कंबरडे पुरते मोडले आहे. केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार आणि गरीब शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.कोकणातील हापूस, कोकम, नारळीपोफळी आणि मच्छीमारी हे उत्पन्नाचे सर्व मार्ग तौक्ते चक्रीवादळाने धुवून टाकले आहे. कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी कधीही नव्हता एवढा जबर फटका बसला आहे. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि राज्य सरकारची डोळेझाक यांमध्ये कोकणातील शेतकरी भरडला जात आहे. संकटावर मात करण्याची जिद्द त्याच्याकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याना मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही भांडारी यांनी केली आहे.

तौत्के वादळाचा नवा जबर फटका

गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीपासून अजूनही असंख्य शेतकरी वंचितच आहे. यंदा तौत्के वादळाने नवा जबर फटका दिल्याने आंबा उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यास सावरणे अशक्य झाले आहे. उद्ध्वस्त कोकणास पुन्हा उभे करण्यासाठी केवळ कागदी आदेश आणि घोषणा पुरेशा नाही. आता त्याला थेट मदत मिळाली पाहिजे. राज्य सरकारने आढावा घेण्यात वेळकाढूपणा न करता तातडीने मदतीचे वाटप करावी. शेतकऱ्यास दिलासा दिला पाहिजे, असे भांडारी यांनी म्हटले आहे.

कोकणी माणसासाठी राज्य सरकारकडे कसलंही धोरण नाही

तौत्के वादळामुळे झालेल्या हानीमुळे किमान पाच वर्षे शेतकऱ्यास डोके वर काढता येणार नाही. मच्छीमार कुटुंबांनाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. किनारी भागातील असंख्य घरेदारे, गोठे उद्ध्वस्त झाले आहेत, तर मच्छीमारांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नौकाची हानी झाली आहे. आंबा-कोकम-काजू, नारळ-पोफळी आणि मच्छीमारी तसेच पर्यटन व्यवसायावर जगणाऱ्या कोकणी माणसासाठी राज्य सरकारकडे कसलेही धोरण नाही. उद्योगांना मदत करण्याची कोणतीही योजना नाही. कोकणच्या नियोजनबद्ध विकासाचे कोणतेही मॉडेल सरकारने आखलेले नाही, असेही ते म्हणाले.

कोकणातील शेतकरी भरडला जातोय

एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि राज्य सरकारची डोळेझाक यांमध्ये कोकणातील शेतकरी भरडला जात आहे. संकटावर मात करण्याची जिद्द त्याच्याकडे आहे. पण त्यासोबत त्याला आता सरकारी दिलाशाची गरज आहे. गेल्या वर्षीपासूनची कोरोनामुळे टाळेबंदी आणि वादळाचा तडाखा अशा दुहेरी संकटात त्याला हात देण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी. तसेच राज्याच्या अन्य भागांतील नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच, कोणताही भेदभाव न करता कोकणासाठीही राज्य सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी आणि कर्जफेडीस मुदतवाढ मिळाली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here