१९७१ च्या युद्धात इंदिराजींची अभूतपूर्व मुत्सद्देगिरी : चारुदत्तबुवा आफळे

0

अमेरिका, इंग्लंड अशा बलाढ्य देशांच्या दबावाकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी दाखविली. पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळविले. तेही अभूतपूर्व होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.

रत्नागिरीत सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात समारोपाचे कीर्तन करताना आफळेबुवांनी १९७१ च्या युद्धात इंदिराजींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबरच पाकिस्तान अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन भाग पडले. पश्चिम पाकिस्तान पंजाबी मुसलमानांचा तर पूर्व पाकिस्तान बंगाली मुस्लिमांचा होता. त्या दोघांचे कधीही पटले नाही. युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. १९६५ मध्ये झालेल्या युद्धात पराभव होऊनही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाली नव्हती. राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना राष्ट्रध्यक्षपदाची स्वप्ने बाळगणारे झुल्फिकार अली भुत्तो भारताविरुद्ध चिथावत होते. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानलाही त्यांना नामोहरम करायचे होते. त्यादरम्यान पूर्व पाकिस्तानमधील मुजीबुर रेहमान यांना निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. ते पश्चिम पाकिस्तानच्या जिव्हारी लागले. या स्थितीत मुजीबुर रेहमान यांच्या मागण्या मान्य करण्याचा कांगावा आणि चर्चेचा देखावा करण्यात आला. तेव्हाचा पाकिस्तानचा लष्करप्रमुख टिक्का खान याने अनन्वित अत्याचार केले. पंजाबचे मुसलमान बंगालच्या मुसलमानांना मारत होते, अशी विदारक स्थिती होती. टिक्काखान दररोज सात हजार माणसे माणसे मारत असे. यामुळे भयभीत झालेले सुमारे नऊ लाख निर्वासित दोन आठवड्यांत भारतात आश्रयाला आले. मुजीबुर रेहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला.

तेव्हाचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्याशी इंदिराजींनी मसलत करून पाकिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. नौदल, वायुदल आणि लष्कराचा योग्य समन्वय साधून कराची बंदरात दारूगोळा आणि साधनसामग्री असलेली चार जहाजे नष्ट करण्यात भारतीय सैन्याला अभूतपूर्व यश मिळाले. कराची किनारा ताब्यात आल्यामुळे पाकिस्तानला मोठी दहशत बसली. त्याच वेळी पूर्व पाकिस्तानातील ढाक्यात भारतीय सेना गनिमी काव्याने मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आली. सुमारे आठ लाख भारतीय सैनिक त्या वेळी वेगवेगळ्या मोहिमांवर काम करत होते. पूर्व पाकिस्तानातील मुक्तीवाहिनीला पुरेसे पाठबळ दिले. त्यातून एक लाख पाकिस्तानी सैनिक शरणार्थी झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार पाकिस्तान आणि बांगलादेश अशी एका देशाची दोन देशांमध्ये विभागणी झाली. ज्या शेख मुजीबुर रेहमान यांना कपटाने पाकिस्तानने अटक करून १८ डिसेंबरला त्यांना फाशी देणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांनाच १६ डिसेंबर रोजी बांग्लादेशच्या राष्ट्राध्यक्षपदी बसविण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या. इंदिराजींच्या या शौर्याचे जाहीर अभिनंदन तेव्हाचे जनसंघाचे खासदार आणि विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी साक्षात दुर्गामाता अशा शब्दांत भर संसदेत केले, असे आफळेबुवांनी सांगितले.

१९७१ नंतरही पाकिस्तानकडून सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यातूनच कारगिलसारखी प्रकरणे घडली आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान टपून बसला आहे. ज्या बांगलादेशला भारताने स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व निर्माण करून दिले, त्या बांगलादेशमधूनही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. लक्षावधी बांगलादेशी भारतात घुसले आहेत. आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना हुसकावून लावण्यासाठी एनआरसीसारखे जे कायदे तयार करण्यात आले, त्याविरोधात आपले मतदार कमी होतील या एकाच भीतीने विरोधकांनी रान उठविले आहे. खोटा प्रचार चालविला आहे. घुसखोरांना प्रतिष्ठित करून त्यांना सत्ता मिळवायची आहे. प्रत्येक भारतीयांनी याचा अभ्यास केला पाहिजे आणि देशाचे अस्तित्व, सुरक्षाव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन बुवांनी शेवटी केले.

कीर्तनाच्या मध्यंतरात इतिहासविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या सार्थक संजय पुराणिक, श्रद्धा विजय क्षीरसागर आणि चंद्रशेखर नीलेश जोशी या विद्यार्थ्यांना पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना कीर्तनसंध्या परिवारातर्फे शाल, श्रीफळ आणि २१ हजारांचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक कल्याण निधीचे काम करणाऱ्या सौ. निंभोरकर आणि लव्ह जिहादमुळे पीडित झालेल्या मुलींचे पुनर्वसन तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नांदेड येथील शेतकऱ्यांच्या २० मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणाऱ्या सौ. शुभांगी आफळे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.पुढच्या वर्षी दोन जानेवारी ते सहा जानेवारी या काळात कीर्तनसंध्या महोत्सव होणार असून त्यामध्ये १९७१ पासून १९९९ पर्यंतचा भारतीय इतिहास हाताळण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here