भाजीपाल्यांची दरवाढ थांबत नाही तोच आता साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या दरवाढीचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. त्यामुळे ग्राहकराजा पुरता चिंतेत असून, अचानकपणे झालेल्या साखरेच्या दरातील वाढ सणासुदीचा काळ कटू करणार की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.मकरसंक्रांतीचा सण तोंडावर आहे. या काळात गूळ, साखरेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. तीळगूळ बनविण्यासाठी मुख्यत्वे गुळाचा वापर होतो. मात्र, तिळाचे इतर पदार्थ वा हलव्याच्या दागिन्यांमध्ये साखरेचा उपयोग करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर साखरेचे दर प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढले आहेत. ठोक बाजारातील साखरेची आवक कमी झाल्याचे कारण यामागे सांगण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा तीस टक्क्यांनी कमी झाले आहे. परिणामत: बाजारपेठांमध्ये साखरेची आवक रोडावली आहे. ठोक बाजाराप्रमाणेच किरकोळमध्येही साखरेची आवक घटली आहे. किरकोळ बाजाराचा विचार करता साखरेच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ झाली आहे. यामध्ये येत्या काही दिवसांत दोन ते तीन रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
