मस्करी मस्करीत लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये इराणला अमेरिकेतील काही ठिकाणांवर बॉम्ब हल्ला करण्याचा सल्ला देणे एका अमेरिकन भारतीयाला चांगलेच महागात पडले आहे. अशीन फणसे या प्राध्यापकाला या फेसबुकवरील सल्ल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. बोस्टनमधील बॉबसन कॉलेजने ही कारवाई केली आहे. “फणसे यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेली पोस्ट ही कॉलेजचे नियम आणि मुल्य तसेच अमेरिकन संस्कृतीला धरुन नाहीत,” असं कॉलेजने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टसाठी फणसे यांनी माफी मागितल्यानंतरही कॉलेजने ही कारवाई केली आहे.
पार्श्वभूमी काय?
शुक्रवार ३ जानेवारी रोजी अमेरिकेने कासीम सुलेमानी या इराणी जनरलच्या ताफ्यावर बगदाद विमानतळावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुलनेमानी ठार झाला. या हल्ल्यामुळे संतापलेल्या इराणने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं सांगितलं. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दम भरला. “इराणने काही करण्याआधी लक्षात ठेवावं की आम्ही इराणमधील हल्ले करायला योग्य अशी ५२ महत्वपूर्ण संस्कृतिक स्थळे लक्ष्य म्हणून हेरून ठेवली आहेत. ती नष्ट करायला आम्हाला वेळ लागणार नाही,” असा इशाराच ट्रम्प यांनी दिला. मात्र त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिका कोणत्याही संस्कृतिक स्थळांवर हल्ले करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
काय पोस्ट केलं होतं फणसेंनी…
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरुनच फणसे यांनी फेसबुकवर पाच जानेवारी रोजी एक पोस्ट केली. या पोस्टमधून त्यांनी इराणला एक सल्ला दिला. “आता इराणनेही त्यांना बॉम्ब हल्ला करायचा आहे अशा अमेरिकेतील ५२ महत्वपूर्ण संस्कृतिक स्थळांची यादी जाहीर करायला हवी,” अशी पोस्ट फणसे यांनी केली होती.
