बीएसएनल कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी ठेकेदार देणार कामगार

0

कणकवली : चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरातील सर्व्हीस रोडवरील खड्डे पावसाची उघडीप मिळाल्यानंतर बुजविण्यात येतील तर स्ट्रीटलाईटचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. महत्वाच्या ठिकाणची बॅरिगेट्स काढण्यात यावी तसेच वाहतूक कोंडीवर खासगी सुरक्षारक्षक नेमत पोलिसांचीही जादा कुमक देण्यात यावी, शहरातील शेकडो दुरध्वनी बंद असून बीएसएनलच्या कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी ठेकेदार कंपन्यांनी दहा कामगार देण्याचे ठरविण्यात आले. हायवे बाधितांचे प्रलंबित असलेले निवाडे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच चौपदरीकरण कामाविषयीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनी, महामार्ग प्राधिकरण व भाजपा पदाधिकारी यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून समन्वय राखण्यात येईल असे निर्णय भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कोकण पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आले. महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेली दुरावस्था आणि नागरी सोयीसुविधांबाबत आढावा घेण्यासाठी माजी आ. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत कणकवली शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता श्री. महाजनी,  दिलीप बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक प्रदीपकुमार यादव, बीएसएनएलचे अधिकारी रोहित उपाध्याय,  भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल, भाजपा वाहतूक आघाडी अध्यक्ष शिशीर परूळेकर, जिल्हा सरचिटणीस रवी शेट्ये, डामरे माजी सरपंच बबलू सावंत, महेश सावंत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र या नव्याने बनविलेल्या महामार्गाची सरफेस लेवल कुठेच एकसमान आढळून येत नाही. त्यामुळे केवळ दुचाकी नव्हे तर चारचाकी वाहनातूनही प्रवास करताना हिंदोळे बसतात. सिंगल पिलर असणारे वाय टेंशन पूल कणकवली सारख्या लहान शहरात असणे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. भाजपा सरकारने अब्जावधी निधी प्रामाणिकपणे दिला आहे. त्याच प्रामाणिकपणे हायवे ठेकेदाराने दर्जेदार काम करावे अशी अपेक्षा प्रमोद जठार यांनी व्यक्‍त केली. महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरात निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रामुख्याने बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र पावसाचा जोर असल्याने डांबर वाहून जाते व खडी उखडली गेल्याने पुन्हा खड्डे पडतात. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजविले जातील असे प्रदीपकुमार यादव यांनी सांगितले. सर्व्हीस रोडवरील स्ट्रीटलाईट 80 टक्के पूर्ण झाली असून प्रांताधिकारी कार्यालयाजवळील काही भाग शिल्लक असून ते काम दोन दिवसात केले जाईल असे सांगण्यात आले. सर्व्हीस रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत तसेच जादा पोलिक मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील शेकडो दुरध्वनी चौपदरीकरण कामामुळे बंद आहेत. बीएसएनएलकडे केवळ दोन तंत्रज्ञ असून इतर कर्मचारी नसल्यामुळे बिघाड दूर करण्यात विलंब होत असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले. बीएसएनएलचे काम जलदगतीने व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने दहा कामगार उपलब्ध करून देण्याची सूचना माजी आ. प्रमोद जठार यांनी केली. त्याला कंपनी अधिकार्‍यांकडून सहमती दर्शविण्यात आली. शहरातील काही हायवे बाधितांचे निवाडे प्रलंबित असल्याने सर्व्हीस रोडचे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. निवाडे झाले नसल्याने प्रांताधिकार्‍यांकडे भरपाईची रक्‍कम प्राप्त झालेली नाही. अशा प्रलंबित निवाड्यांची माहिती घेऊन त्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची आपण भेट घेणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. चौपदरीकरणाचे काम जलदगतीने व्हावे, त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांवर शासन स्तरावरून तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी व भाजपा पदाधिकारी यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपकडून समन्वय राखत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे ठरविण्यात आले. 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here