जिल्ह्यात तीन तालुक्यांत गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

0

रत्नागिरी : वायू वादळाच्या प्रभावामुळे लांबणीवर पडलेला पाऊस यंदा सरासरी भरून काढेल का, अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना पावसाने मात्र मुसळधार कोसळत सरासरी भरून काढली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यात गतवर्षी 28 जुलैपर्यंत पडलेल्या पावसापेक्षा यंदाचे पर्जन्यमान जास्त आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे उत्तर रत्नागिरीत चिपळूण, खेडमध्ये शनिवारपर्यंत असलेली पूरस्थिती ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यंदा पावसाला जून महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात सुरुवात झाली. सुरुवातीचे काही दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातील विशिष्ट भागातच पाऊस पडत होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळला. परिणामी, या भागातील नद्या-नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. चिपळूण आणि खेडमधील सखल भागात नद्यांच्या पुराचे पाणी साचले. मुंबई-गोवा महामार्गावरही दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या. कोकण रेल्वेमार्गही प्रभावित झाल्याने गाड्यांच्या वेग कमी करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील तीन तालुक्यात दि. 28 जुलैपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला आहे. सात तालुक्यात दोन हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. खेडमधील जगबुडी, नारंगी तर चिपळूणमधील  वाशिष्ठी तसेच शिवनदीला आलेला पूर ओसरल्याने नागरिकांनी नि:श्‍वास टाकला आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here