तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींची नुकसानभरपाई : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीसाठी कोकणवासीयांना प्राथमिक टप्प्यात २५२ कोटींची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत श्री. सामंत बोलत होते. ते म्हणाले, गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई ज्या दराने देण्यात आली, त्याच दराने भरपाई देण्याचा निर्णय आज झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफमधील तरतुदीनुसार ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. पण त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष देऊन भरपाईची रक्कम २५२ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही भरपाई व्यक्तिगत नुकसान, मृतांच्या वारसांना मदत, घरे, गोठ्यांचे नुकसान इत्यादींसाठी आहे. शासनकीय मालमत्तांच्या नुकसानीची भरपाई स्वतंत्रपणे केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भरपाईविषयीची माहिती देताना ते म्हणाले की, जिल्ह्याला ३० कोटी ७३ लाख ४३ हजाराची भरपाई दिली जाणार आहे. सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार ६५७८ घरांचे अंशतः नुकसान झाले असून पूर्वीच्या निकषानुसार चार कोटी ६० लाख ८००० रुपयांची भरपाई मिळू शकली असती. पण त्यामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे आता दहा कोटी १५ लाख २० हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. सतरा कुटुंबांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना पंचवीस लाख ५० हजाराची भरपाई दिली जाईल. शेतीचे अडीच हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्याकरिता पूर्वीच्या दराने हेक्टरी १८ हजाराची भरपाई दिली गेली असती. पण नव्या निकषानुसार हेक्टरी ५० हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. शेतीच्या ८० टक्के नुकसानीचे पंचनामे झाले असून त्याकरिता बारा कोटी ५० लाखाची भरपाई दिली जाणार आहे. घरांच्या नुकसानीकरिता १५ टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्यांना १५ हजार, २५ टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्यांना २५ हजार, तर ५० टक्के नुकसान झालेल्यांना पन्नास हजाराची भरपाई दिली जाईल. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्यांना दाड लाखाची भरपाई दिली जाणार आहे. मच्छीमारी नौकांच्या अंशतः नुकसानीकरिता प्रत्येकी दहा हजार रुपये, तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या मच्छीमारी नौकांकरिता २५ हजाराची भरपाई दिली जाणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. मच्छीमारी जाळ्यांकरिता पाच हजार रुपये दिले जातील. अद्याप सर्व पंचनामे पूर्ण झालेले नसल्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर भरपाईच्या रकमेत वाढ होईल, असेही श्री. सामंत यांनी नमूद केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 28-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here