विजेच्या तारांजवळ पतंगबाजी टाळा

0

मकर संक्रातीच्या निमित्ताने होणाऱ्या पतंगबाजीच्यावेळी विजेच्या तारांपासून सावध रहा. विजेचे वहन होणाऱ्या पारेषण तारांजवळ पतंग उडवणे टाळा. अन्यथा मोठ्या अपघातासह ग्रीड बंद पडण्याचीही भीती आहे, असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या कंपनीने केले आहे. मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने अनेकजण सकाळपासून पतंग उडवतात. तसेच काटली गेलेली पतंग पकडण्यासाठीही अनेकजण उत्साहात असतात. पण हे करताना जवळ विजेच्या तारा असल्यास त्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. मुंबईच्या अनेक भागांतून वीजवितरणाच्या तारांसह विजेचा पुरवठा करणाऱ्या अधिक क्षमतेच्या (हाय व्होल्टेज) पारेषण ताराही जातात. या तारांमध्ये पतंग अडकल्यास उच्च दाबामुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू होण्याची भीती असते. यामुळे विजेच्या सामान्य तारांसह अशा हाय व्होल्टेज तारांपासून विशेष दक्ष राहण्याची गरज आहे. याबाबत एईएमएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामध्ये धातूच्या भुकटीचा उपयोग होतो. त्यामुळे हा मांजा विजेचा सुवाहक असतो. या माजांतून विजेचा प्रवाह जलद वाहतो. त्यामुळेच हा मांजा विजेच्या तारांच्या संपर्कात येणे अत्यंत धोक्याचे असते. वीज पारेषण करणाऱ्या तारांची क्षमता तब्बल दोन लाख २० हजार व्होल्ट इतकी असते. त्यामुळे हा मांजा या तारांना स्पर्शूनच नाही तर जवळून गेला तरी विजेचा प्रवाह तत्काळ आकर्षित होतो. त्यातून पतंग उडविणारा, फिरकी पकडणारा व एकूणच त्या पतंगांशी संबंधित सारेच भीषण धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे पतंगांचा आनंद जरूर लुटावा, मात्र विजेच्या तारांपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here