श्री देव मार्लेश्वर व गिरीजा देवीचा आज विवाह सोहळा

0

 मकरसंक्रांतीला लाखो भाविकांची पावले वळतात ती सहयाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे. औचित्य असते ते श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजा देवी यांच्या विवाह सोहळ्याचे. प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रातीला आज (१५ रोजी) देवतांचा कल्याणविधी सोहळा थटामाटात साजरा होणार आहे, देवरूख शहरापासून सुमारे १७ की. मी अंतरावर श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसलेले आहे. बुधवारी श्री देव मार्लेश्वर व गिरीजा देवीचा विवाह सोहळा सनई चौघड्यात, सुमधूर मंगलाष्टकांनी व हर हर महादेवच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने संपन्न होणार आहे. या देवस्थानाच्या दर्शनासाठी व विवाह सोहळ्यासाठी भाविक मंगळवारपासून मार्लेश्वर नगरीत दाखल झाले आहेत. लाखो भाविकांच्या साक्षीने कल्याण विधी समारंभ पार पडणार आहे. यानिमित्ताने मार्लेश्वर नगरीला मोठ्या यात्रेचे स्वरूप आले आहे. बुधवारी सकाळी मकरसंक्रांती दिनी आद्य मार्लेश्वर आंगवली मठातून देवाची पालखी गुहेतील गाभाऱ्या पर्यंत आणली जाणार आहे. या पालखीसमवेत पाटगावचे मठपती, लांजा वेरवली चे मराठे, मुरादपूरचे भोई, चर्मकार मशालजी, मारळचे सुतार, अबदागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी न्हावी, असा मानकऱ्यांचा जमाव बरोबर असणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावातून वधू देवी गिरिजा मातेची पालखी मार्लेश्वरला येणार आहे. कल्याणविधी सोहळ्याचे यजमान असलेली देवरूख नजीकची श्री व्याडेश्वराची पालखीही मार्लेश्वरकडे येणार आहे. आंबव, लांजा व मुरादपूर येथील दिंड्याही आनंदाने सामील होणार आहेत. महत्वाच्या कल्याण विधी प्रसंगी तिन्ही पालख्या आणल्या जाणार आहेत. लांजाचे मठाधिपती मार्लेश्वर देवाचा तर शेटये गिरिजा देवीचा टोप मांडीवर घेवून बसतात व सोहळा आनंदाने पौराहित्य रायपाटणकर स्वामी यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी साजरा केला जाणार आहे. रात्री साक्षी विडे भरून कल्याणविधी सोहळ्याची सांगता होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here