धनंजय कीर यांचे नाव विद्यापीठ उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे स्वागत

0

रत्नागिरी : भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे कीर कुटुंबीय आणि निकटवर्तीय व्यक्तींकडून स्वागत करण्यात आले. नामकरणाबाबतचा निर्णय नुकताच जाहीर झाला. धनंजय कीर यांचे पुत्र डॉ. सुनीत कीर, नातू डॉ. शिवदीप कीर, मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर, कीर चरित्राचे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि कीर यांची नात डॉ. कामायनी सुर्वे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. यासंबंधी आवश्यक ती पावले तातडीने उचलल्याबद्दल त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धन्यवाद दिले.

डिसेंबर २०२० मध्ये जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धनंजय कीर यांचे नाव विद्यापीठ उपकेंद्राला देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हा विषय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवून श्री. भाटकर यांना तसे कळविले. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भाटकर यांनी ही मागणी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तसेच ६ जानेवारी रोजी त्यांनी मंत्री श्री. सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली. दरम्यान, अशा नामकरणाची मागणी करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनीही पत्रकारांना दिली. धनंजय कीर यांच्या रत्नागिरी शहरातील घराजवळच राहणारे जयू भाटकर यांना लहानपणापासून या लेखकाबद्दल कुतूहल वाटे. रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रात निवेदक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी आपले सहकारी महेश केळुसकर यांच्या सहकार्याने कीर यांची मुलाखतही घेतली होती. उपकेंद्राला कीर यांचे नाव देण्याची मागणी अल्पावधीत मंजूर केल्याबद्दल श्री. भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना धन्यवाद दिले. अनेकांनी मागणी करूनही ज्या विद्यापीठाने धनंजय कीर यांना सन्मान्य डीलिट देण्याचा निर्णय घेतला नाही, त्याच मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नाव देण्याचा ठराव त्याच विद्यापीठाने संमत केला हे उशिरा का होईना, चरित्रकार धनंजय कीर यांच्या योग्यतेवर मुंबई विद्यापीठाने केलेले शिक्कामोर्तब आहे, अशा शब्दांत कीर यांचे चरित्र लिहिणारे मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here