चिपळूण व खेर्डी परिसरात बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे एक कोटी रुपयांचे नुकसान

0

चिपळूण : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चिपळूण व खेर्डी परिसरात पुराच्या पाण्यामुळे बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर शहरातील पुराचे पाणी ओसरले असले तरी रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या मनात पुराची भीती कायम होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाजारपेठेसह चिपळूण शहराची पाहणी करून माहिती घेतली व प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना केल्या. गेले दहा दिवस चिपळूण परिसराला संततधार व जोरदार पावसाच्या सरींनी चांगलेच हैराण केले. शुक्रवारपासून पावसाच्या सरींनी चांगलाच जोर धरला. परिणामी, रात्री 10.30 वाजल्यानंतर चिपळूण शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. रात्री 11.30 नंतर शहरातील बहुतांश सखल व पाणथळ भाग पाण्याखाली गेला. रात्री 2 वाजल्यानंतर पाण्याची पातळी वाढली. दुसरीकडे पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने पहाटे चार ते पाच वाजण्याच्या वेळेत शहरातील बाजारपेठेसह मुख्य नागरी वस्तीत पाण्याची पातळी दोन ते अडीच फुटाने वाढली. खेर्डी बाजारपेठेत रात्री 2 वाजेपर्यंत पुराचे पाणी नव्हते. मात्र, 2.30 नंतर पुराच्या पाण्याने बाजारपेठ वेढली गेली. ग्रामपंचायत कार्यालय परिसरापासून खेर्डी दत्त मंदिर परिसरापर्यंत बाजारपेठेमध्ये एक ते तीन फूट पाणी साचले होते. परिणामी, मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानातून दोन ते अडीच फूट पाणी शिरले. 2005 नंतर खेर्डीमध्ये तब्बल 14 वर्षांनी पुराचे पाणी शिरले. 2005च्या महापुरानंतर चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी बाजारपेठेतील मुख्य रस्ता सुमारे पाच फूट उंच करण्यात आला. त्या वेळेपासून या परिसरात पुराचे पाणी येण्याचे प्रमाण कमी झाले. त्यापूर्वी चिपळूण व खेर्डी परिसरात पुराचे पाणी प्रथम खेर्डीमध्ये भरत असे. मात्र, रस्त्यामुळे हे प्रमाण कमी झाले. 2005 नंतर म्हणजेच 14 वर्षानंतर यावेळी प्रथमच खेर्डी बाजारपेठेत पाणी शिरले. चिपळुणात आलेला पूर हा एक तपानंतर म्हणजेच बारा वर्षांनी आला. 2005 नंतर 2007 मध्ये महापूर आला होता. त्यानंतर बारा वर्षांनी म्हणजेच शुक्रवारी (दि. 26) शनिवारी पहाटेपर्यंत महापुराचे पाणी शहरात घुसले. 2005 व 2007 च्या तुलनेत पाण्याची पातळी सव्वाचार ते दोन फुटाने कमी होती. रात्री 12 वाजल्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून भरतीच्या पाण्याचा जोर वाढत असल्याची माहिती मिळताच चिपळूण बाजारपेठेतील सुमारे 70 टक्के व्यापार्‍यांनी बाजारपेठेत येऊन दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविता. दरम्यान, रविवारी (दि. 28) दुपारी 2 वाजल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. परंतु शिव व वाशिष्ठी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पुराची भीती नव्हती. मात्र, जोरदार पावसाच्या सरीमुळे रात्रीच्या सुमारास पुन्हा पूर येण्याची शक्यता व्यक्‍त होत होती. त्यामुळे व्यापारी व सखल भागातील नागरी वस्तीतील रहिवासी सतर्क झाले. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी सकाळी  चिपळूण बाजारपेठ परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांनी काही नागरिक व व्यापार्‍यांशी चर्चा करुन न. प. व महसूल प्रशासनाला सूचना केल्या. जिल्हाधिकार्‍यांनी बाजारपेठेसहीत बहादूरशेख पूल परिसर, नाईक कंपनी बाजारपूल परिसर, उक्‍ताड, पेठमाप, वाशिष्ठी नदी पात्र आदी ठिकाणी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, न.प.चे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here