तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रूग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग, सोयी सुविधांचा अभाव त्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही त्याला जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने आता पुन्हा एकदा याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायपाटण ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश नलावडे यांनी प्रजासत्ताक दिनी रायपाटण ग्रामीण रूग्णालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे
निवेदन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांना दिले आहे.तालुक्यात राजापूर व रायपाटण अशा दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यापैकी रायपाटण मधील रुग्णालय हे तालुक्याच्या पूर्व परीसरातील सुमारे साठ ते सत्तर टक्के गावांसाठी उपयुक्त ठरत आहे. शिवाय ओणी – अणुस्कुरा मार्गावरील महत्वपूर्ण रुग्णालय असुन सततच्या रहदारीमुळेअपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे रुग्णालय महत्वाचे ठरत आहे.मात्र दुसरीकडे मागील दहा ते पंधरा वर्षात या रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.त्यामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग व सोयी सुविधांचा सामावेश आहे.या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक चेवर्ग -१ हे पद ,वैद्यकीय अधिकारी वर्ग – २ ची ३ पदे त्यामध्ये प्रत्येकी एकेक बालरोग तज्ज्ञ,स्त्रीरोग व आर्थोपिडीक तज्ञ ही पद रिक्तआहेत. या व्यतिरीक्त औषध निर्माता पद भरलेले असूनही ते कार्यरत नाही. कायम स्वरुपी क्षकिरण तज्ज्ञ, आधुनिक क्ष किरण मशीन, सक्षन मशीन, कॅलरीमिटर यांची अवश्यकता असुन आठवड्यातून किमान तीन दिवस डेंटीस्ट येणे अपेक्षीत आह. एखादा गंभीर अपघात घडल्यास त्या रुग्णाला कोल्हापुर किंवा अन्य जिल्ह्यातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी न्यावयाचा असेल तर शासकीय रुग्णवाहीकेचा कायमस्वरूपी परवाना आवश्यक आहे. रुग्णालयाला संरक्षक भिंत, परीसरातस्ट्रीट लाईट लावणे ,कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होणे दरवर्षी पावसाळ्यात लागणारी गळती, इमारतींची धोकादायक स्थिती त्यामुळे सर्व इमारतींची दुरुस्ती अशा विविध मागण्या अनेक वर्षे करण्यात आल्या आहेत. मात्र शासनाने त्याला केराची टोपली दाखवली. परीणामी संतप्त रायपाटणवासीयांनी गतवर्षी प्रजासत्ताकसह स्वातंत्रदिनी रास्तारोकोचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हा शल्यचिकीत्सकांनी रायपाटणला भेट देताना प्रलंबीत समस्यांच्या पुर्ततेबद्दल ठोस आश्वासन दिल्याने ती आंदोलने स्थगीत करण्यात आली होती. नंतर त्या आश्वासनांची पुर्तता करण्यात आली नाही. असा आक्षेप सरपंच नलावडे यांचा असुन त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
