24 तासात 40 किमी रस्त्याचा विक्रम, बांधकाम विभागाच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

0

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता रविवारी एका दिवसात तयार करून नवा विक्रम स्थापित केला आहे. यापूर्वी विजयपूर-सोलापूर हा २५.५४ किलोमीटर रस्ता १४ तासांत पूर्ण केल्याचा केला होता. या विक्रमाची लिम्काबुकमध्ये नोंद झाली आहे.

यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ अभियंत्यांनी उद्योजकामार्फत ६० अभियंते, ४७ पर्यवेक्षक, २३ गुणवत्ता नियंत्रक अभियंते, १५० वाहनचालक, ११० मजुरांनी तीन पाळ्यांत काम केले. अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सूक्ष्म नियोजन केले होते. गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी आठ मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लांट, ७ मॉडर्न सेन्सर पेव्हर, १२ व्हायब्रेटरी रोल, ६ न्यूमॅटिक रोलर १८० डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला. १,१०० मेट्रिक टन डांबर व ६,००० घनमीटर खडीचा वापर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करीत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण उपस्थित होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रोत्साहन
या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले.

कोरोना काळात अनेक अडचणी असताना बांधकाम विभाग आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे.
-अशोक चव्हाण, मंत्री सार्वजिनक बांधकाम विभाग

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here