लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्षाला शिवसेना नाव ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारणा केली होती का?, अशी टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने संजय राऊत भडकले होते. टीका करताना राऊतांनी शिवरायांच्या वंशजांनाही बोल लावले होते. मंगळवारी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी राऊतांना चांगलंच सुनावलं होतं. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिल्याने उदयनराजे-राऊत यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रसंगाला मी हिंमतीने सामोरं जातो. त्यामुळे समोर कितीही मोठा माणूस असू द्या त्याला मी घाबरत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर माझ्यावर अंगावर या, असं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे.
