कोल्हापुर- रत्नागिरी या महामार्गावरील साखरपा तिठा येथे दोन पादचाऱ्यांना धडक देऊन अपघात केलेल्या करवीर तालुक्यातील कोळंबे वेथील इको वाहन चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये दोन पादचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत । राजाराम रामचंद्र लिंगायत (रा. साखरपा, गुरववाडी) यांनी फिर्याद दिली आहे. राजाराम लिंगायत व त्यांचे सहकारी चंद्रकांत लिंगायत हे सोमवारी रात्री ११.१५ वाजता साखरपा तिठा येथे रस्त्यावरून चालत होते. याचवेळी विकी सदाशिव बीडकर हे आपल्या ताब्यातील इको गाडी (एमएच-०९, एफजे-२३९०) घेऊन कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशने निघाला होता. राजाराम व चंद्रकांत लिंगायत हे रस्त्यावरून जात असताना इको गाडीची दोघांनाही धडक बसून अपघात घडला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. राजाराम लिंगायत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकी बीडकर याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कॉन्स्टेबल हेमा गोतावडे करीत आहेत.
