सातारा व महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीला भगदाड

0

लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे काम करुनही त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरघोड्यांचे राजकारण केले जात आहे. कुडळामध्ये भाजपच्या अमित कदमांच्या कार्यक्रमात उदयनराजेंच्या नावाने घोषणा कशा दिल्या गेल्या?, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदांचे राजीनामे द्यायला सर्व कार्यकर्ते तयार आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यास मतदारसंघात विकासकामे करता येतील. मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढवणे, एमआयडीसीबरोबरच रखडललेले पाणी प्रकल्प मार्गी लागतील. त्यामुळे बाबाराजे, भाजपात प्रवेश करा, असा सूर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नगर विकास आघाडीच्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी तसेच कार्यकर्त्यांनी आळवला. 

आमदार शिवेंद्रराजे यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह होत असताना महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, नगरसेवक सुनील शिंदे, प्रशांत आखाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादीच्या इतर आमदारांकडून याबाबत नकार दिला जात असला तरी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सर्वेसर्वा असलेल्या नगर विकास आघाडीतील कार्यकर्त्यांनीही शिवेंद्रराजेंनी भाजपात जाण्यासाठी रेटा उभा केला आहे. त्याचे पडसाद सोमवारी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक  जि. प. सदस्य व पं. सं. सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत उमटले. तर किसनशेठ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. यामुळे नगरपालिकेत भाजप मजबूत झाली असून राष्ट्रवादीसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here