डिसेंबरपर्यंत कोकण रेल्वे विजेवर धावणार : सुनीत शर्मा

0

रत्नागिरी : कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त करण्यासाठी या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील काही टप्प्यात विजेच्या इंजिनावर मालगाडय़ा धावत आहेत, परंतु संपूर्ण कोकण मार्गावर विजेवरील गाडय़ांचा प्रवास डिसेंबरपर्यंत सुरू होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी पत्रकारांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधताना दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘कोकण रेल्वे मार्गावरील 740 किलोमीटर मार्गापैकी 317 कि.मी. मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. हे विद्युतीकरण दोन टप्प्यांत सुरू आहे. ज्या ठिकाणी विद्युतीकरण झालेले आहे तेथे विजेच्या इंजिनावर मालगाडय़ा धावत आहेत. पॅसेंजर कोच चालवताना थोडय़ा अडचणी आहेत, येथील विद्युतीकरणाचे कामही 85 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. हा मार्ग संपूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत येत्या डिसेंबर महिन्यापासून विजेवरील मेल-एक्सप्रेससाठी तयार होईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

कोकणचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे लवकरच कोकणचा प्रवास हायटेक आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यानच्या 203 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने तेथे विजेच्या इंजिनावर चाचणी यशस्वीपणे पार पडली होती. जेथे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे तेथे विजेवरील इंजिनाच्या सहाय्याने मालगाडय़ा धावत आहेत. डिसेंबर 2021 मध्ये संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे कोकण रेल्वेचे ध्येय आहे.

बुलेट ट्रेनला गुजरात राज्यातील 95 टक्के जमीन संपादन पूर्ण झाल्याने तेथे टेंडर वाटून कामेही सुरू झाली आहेत. महाराष्ट्रातील जमीन संपादन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गुजरात राज्यातील वापीपर्यंतचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पालघर, ठाणे आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत जमीन संपूर्ण ताब्यात येत नाही तोपर्यंत टेंडर प्रक्रिया सुरू करताच येत नाही, त्यामुळे बुलेट ट्रेन कधी पूर्ण होणार यावर उत्तर देता येणार नसल्याचे सुनीत शर्मा यांनी सांगितले. कोरोना काळात आवश्यकतेनुसार लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढविण्यात येत आहेत. आतापर्यंत रेल्वेने 15 राज्यांत 593 ऑक्सिजन ट्रेन चालवून 1401 टँकरद्वारे 23,658 मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायूची वाहतूक केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 738 किसान रेल्वेद्वारे 2.33 लाख टन कृषिजन्य मालाची वाहतूक केल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here