राजापूरमध्ये बेकायदा चिरे उत्खनन सुरु

0

राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विनापरवाना आणि बेकायदा चिरे (जांभादगड) उत्खनाकडे राजापूर महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. तालुक्यात अनेक भागात दिवस-रात्र नियम धाब्यावर बसवून अनेक चिरेखाण व्यावसायिकांकडून अशा प्रकारे बेकायदा आणि विनापरवाना उत्खनन केले जात आहे. महसूल प्रशासन आपल्या डोळ्यावरिल पट्टी काढून या बेकायदा चिरेखाण उत्खननाकडे लक्ष देणार आहे की नाही? असा सवाल आता सर्वसामान्य  जनतेतुन उपस्थित केला जात आहे. काही चिरेखाण व्यावसायिक तर घेतलेल्या परवानगी पेक्षा कितीतरी अधिक पटीने उत्खनन करत असून दिवसरात्र धडधडणाऱ्या या उत्खनन मशिन्स आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका लगतच्या जनतेला बसत आहे. महसूल प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.राजापूर तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चिरे उत्खनन (जांभादगड) होते. तालुक्यात विखारेगोठणे, दोनिवडे, जुवाठी, तारळ, उपळे, प्रिंदावण, हातिवले, गोठणेदोनिवर्ड या परिसरासह रानतळे, बारसू, धोपेश्वर अन्य अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर चिरेखाणी आहेत. अनेक चिरेखाण व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर चिरे निर्मिती व पुरवठ्याचा व्यवसाय करतात. मात्र अनेक चिरेखाण व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर बसवून चिरे उत्खनन केले जात आहे. प्रशासनानाकडून घातल्या जाणाऱ्या नियम आणि अटींचे कोणत्याही प्रकारे पालन न करता आपल्या मर्जीप्रमाणे अनेक चिरेखाण व्यावसायिक उत्खनन करत आहेत. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयांकडून परवाने घेऊन प्रत्यक्षात त्या परवान्याप्रमाणे व निश्चित केलेल्या क्षेत्रात उत्खनन न करता त्यापेक्षा कितीतरी पट अधिक जागेत उत्खनन केले जात आहे. दिवस-रात्र बेकायदेशीरपणे आणि उघडपणे या चिरेखाण व्यावसायिकांकडन उत्खनन केले जात आहे. या उत्खनन यंत्रांचा खडखडाट आणि उडणारी धूळ यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतआहे. काही ठिकाणी चोरट्या पध्दतीने वाहतूक करून प्रशासनाची दिशाभूल करून चिरे वाहतूक केली जात आहे.मोठ्या प्रमाणावर व खोलवर केलेल्या उत्खननानंतर त्या चिरेखाणी योग्य पध्दतीने भरणे, कंपाऊंड करणे आवश्यक असतानाही काहीचिरेखाण व्यावसायिकांकडून ते केले जात नसल्याने गंभीर अपघात होत आहेत.मात्र अशा प्रकारे उत्खननाला परवानगी देणाऱ्या महसूल प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर त्याची योग्य अंमलबजाणी होतेय का? परवानगी प्रमाणे उत्खनन केले जातेय का? नियम आणि अटींचे पालन केले जातेय का? हे पहाणे गरजेचे असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासन आणि चिरेखाण व्यावसायिकांच्या साटेलोट्याची चर्चादेखील होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी नियमावर बोट ठेवणारे महसूल प्रशासन बेकायदा आणि विनापरवाना चिरे उत्खनन करून नियम धाब्यावर बसविणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकांवर एवढे मेहरबान का असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

HTML tutorialLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here