जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल – ठाकरे सरकार

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यावेळी, काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? याची चर्चा रंगली होती. अखेर, आज हे कोड उलगडलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ पालकमंत्री असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मुख्यमंत्री यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. ठाकरे सरकारमधील 36 मंत्र्यांचा हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे 43 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून वंचित रहावे लागले होते. मात्र, आता आणखी एका मंत्र्याला पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला असून कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची आणि भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. या नियुक्तीमुळे सतेज पाटील हे नाराज होते. तर, काँग्रेस नेत्यांनाही या नियुक्तींमध्ये बदल हवा होता. त्यानुसार, अखेर कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर, अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रिफ यांच्याकडे पदभार आहे. आता, विश्वजीत कदम यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचं पालकत्व असणार आहे. या निर्णयामुळे काँग्रेसच्या 11 ऐवजी 12 मंत्र्यांकडे पालकमंत्र्यांची जबाबदारी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here