अबब ! महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा खर्च तब्बल 2.79 कोटी रुपये

0

महाविकास आघाडी सरकारचा भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा आकडा माहितीच्या अधिकाराखाली उघड करण्यात आला आहे. या सोहळ्यावर 2.79 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आल्याची माहिती, ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांना देण्यात आली आहे. चनशेट्टी यांनी याबाबत माहिती मागितली होती. दादर येथील शिवाजी पार्क अर्थात शिवतिर्थावर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर 2019 ला पार पडला होता. या सोहळ्यासाठी एकूण 2.79 कोटी रुपये खर्च करण्यात आला हा खर्च फडणवीस सरकारच्या 2014 मधील शपथविधी सोहळ्यापेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपालांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. या शपथविधी सोहळ्याचा भव्य सेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारला होता. या सोहळ्यातील 2 कोटी 70 लाख 7 हजार 374 रुपयांपैकी 3लाख 3 हजार 257 रुपये हे फुलांच्या सजावटीसाठी वापरण्यात आले तर 2 कोटींहून अधिक रक्कम ही लायटिंग आणि अन्यबाबींसाठी वापरण्यात आल्याची माहिती यातून समोर आली आहे. चनशेट्टी यांनी 2009,2014 आणि 2014 मधल्या शपथविधी सोहळ्यातील खर्चाचे आकडे माहितीच्या अधिकाराखाली मागवले होते. त्यांना 2009 सालातल्या शपथविधी सोहळ्यातील खर्चाची माहिती मिळाली नाही, 2012 साली मंत्रालयाला लागलेल्या आगीत ही कागदपत्रे जळाली असे सांगण्यात आले आहे. ऑक्‍टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्या सोहळ्यावर 98.38 लाख रुपये इतका खर्च झाला होता, अशीही माहिती त्यांनी दिली. 2014 आणि 2019 मधील शपथविधी सोहळ्यातील खर्चात एकूण 1.81 कोटींची तफावत असल्याचेही यातून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here