विधानसभा, नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीत सेनेला साथ देत राष्ट्रवादी पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा तालुकाध्यक्ष तथा नगर पालिकेतील गटनेते सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे रत्नागिरीचे राजकारण पुन्हा गढूळ झाले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याचा त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. रत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. या पाच नगरसेवकांपैकी सौ. कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा येथील सोहेल साखरकर यांना लेखी स्वरूपात राजीनामा देण्याचे आदेश गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले होते. मात्र पक्षाच्या नोटीसीला एकाही नगरसेवकाने लेखी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गटनेते सुदेश मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेत चौघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
