चिपळूण येथील पालिकेचा सन २०२० ते २०२१ चा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. परंतु बजेटची आम्हाला पूरेपूर माहिती नाही असे कारण देत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर हा विषय फेटाळून लावला. त्यामुळे यासंदर्भात येत्या २२ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. बुधवारी झालेल्या या बैठकीला स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. भाजपची साथ सोडल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सेना सांगेल तसे निर्णय घेतले जात आहेत. याचेच प्रत्यंतर या बैठकीत सुद्धा आले. यापूर्वीही अनेक विकासकामे नामंजूर करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. अर्थसंकल्पाला स्थायी समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते मंजुरीसाठी मुख्य सभेत ठेवले जाते. परंतु स्थायी समितीच्या बैठकीतच अर्थसंकल्प मंजुरीसाठी आडकाठी आणली गेली आहे. पालिकेचे लेखापाल आणि सहाय्यक लेखा परिक्षक हे महिन्याभरासाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे आम्हाला अर्थसंकल्पाची व्यवस्थित माहिती मिळालेली नाही. याचा अभ्यास करता यावा म्हणून हे दोघे हजर झाल्यानंतर आम्ही माहिती घेऊ, त्यानंतरच बैठक घेण्यात यावी, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मांडली. याला नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे व भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. परंतु बहुमतामुळे महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यामुळे २२ जानेवारीपर्यंत ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपकडून मात्र यावरून जोरदार टीका करण्यात आली. महाविकास आघाडी विकासकामांमध्ये अडथळे आणून पालिकेचे आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांमधून केला जात आहे.
