चक्क 97 वर्षाच्या महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात…

0

भारत एक विशाल देश असल्याने दर महिन्यात देशाच्या कुठल्यातरी विभागात निवडणुकीचा प्रचार सुरू असतो. सध्या राजस्थानच्या सीकरमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. ही पंचायत निवडणूक असली तरी एका उमेदवारामुळे याची चर्चा देशभरात सुरू आहे. 97 वर्षाच्या एक महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. सीकर येथे पंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये नीमका येथे सरपंच पदासाठी विद्या देवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विद्या देवी या 97 वर्षाच्या आहेत. त्या फक्त उमेदवारी अर्ज भरून थांबल्या नाहीत तर त्या घरोघरी जाऊन प्रचार देखील करत आहेत. 55 वर्षांपूर्वी त्यांचे पती मेजर शिवराम सिंह देखील गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. इतकेच नाही तर विद्या देवी यांचे सासरे सुभेदार सेडूराम यांनी देखील 20 वर्ष गावाचे सरपंच पद भूषवले होते. विद्या देवी यांचा नातू मोंटू सीकर येथील वॉर्ड क्र. 25 मधून जिल्हा परिषदेवर निवडून गेला आहे. यंदा सामान्य गटातील महिलेसाठी ही जागा आरक्षित असल्याने विद्या देवी आपलं नशिब आजमावून बघत आहेत. प्रचारादरम्यान तरुणांना लाजवेल असा जोश त्यांच्यात पाहायला मिळत आहे. विद्या देवी यांची थेट लढत विद्यमान महिला सरपंच सुमन देवी यांच्याशी आहे. याशिवाय अन्य तीन महिला निवडणुकीच्या या मैदानात उतरल्या आहेत. झनकोरी देवी, विमला देवी आणि आरती मीणा या आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. या क्षेत्रात 11 वॉर्ड असून 9 ठिकाणी बिनविरोध सरपंचांची निवड करण्यात आली आहे.सासरे आणि पतीने गावाचा विकास केला. तसेच योगदान आपल्याला द्यायचे असल्याच्या भावना विद्या देवी गावकऱ्यांना बोलून दाखवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here