महामार्गावरील वाहतूक तब्बल तेरा तास ठप्प

0

चिपळूण : शनिवारी (दि.27) दुपारी 3.30  वाजण्याच्या सुमारास परशुराम घाटात कोसळलेल्या अजस्त्र दरडीमुळे तब्बल तेरा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील ही दरड पूर्णपणे बाजूला करण्यात यंत्रणेला यश आल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शुक्रवार (दि.26) पासून चिपळूण शहर परिसरात धुवाँधार पाऊस पडला. परिणामी, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेपर्यंत शहरातील बहुतांश भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला. शनिवारी पावसाचा जोर ओसरला. हळूहळू पुराचे पाणी कमी झाले. पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे बहादूरशेख पुलावरून वाहतूकही सुरळीत झाली. याचदरम्यान शनिवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घाटातील एका वळणावर डोंगरातील मातीचा एक भलामोठा ढिगारा कोसळला. दरड कोसळल्यामुळे तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरडीमुळे महामार्गावर त्या भागातील सुमारे 250 फूट लांबीचा रस्ता बंद झाला. परिणामी, चिपळूण दिशेकडून मुंबईकडे व मुंबई दिशेकडून चिपळूणकडे येणारी सर्व वाहने दरडीच्या दोन्ही बाजूला खोळंबली. उशिरा रात्रीपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दरडीच्या मातीचा रस्त्यावरील पन्‍नास टक्के  भाग बाजूला करण्यात यंत्रणेला यश आले. मात्र, उर्वरित दरडीची माती बाजूला करण्यासाठी यंत्रणेला बरीच मेहनत घ्यावी लागली. कोसळलेल्या दरडीमध्ये पूर्णपणे लाल चिकट माती असल्यामुळे व दुसरीकडे पावसाच्या सरी पडत असल्याने दरउ हटविणे त्रासदायक ठरत होते. दरड कोसळल्यावर सुरुवातीला एक ते दोन जेसीबीच्या माध्यमातून काम सुरू झाले. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. जेसीबी व पोकलेन सारखी यंत्रणा व कामगार यांच्या साहाय्याने सायंकाळी 6 त े7 वाजाल्यानंतर दरडीची  माती काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी चार जेसीबी व दोन पोकलेनसह कामगारांची मदत घेतली. रात्री 10 वाजल्याच्या सुमारास 50 टक्क्याहून अधिक रस्ता मोकळा करण्यात यंत्रणेला यश आले. पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.त्यामुळे दरड व माती वेगाने हटविण्याचे काम सुरू झाले. रविवारी पहाटे 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास अडीचशे फूट लांब  व 25 फूट उंच महामार्गावरील दरड पूर्णपणे बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे तब्बल तेरा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत  झाली. दरम्यान, या सर्व घटनेची पाहणी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. यावेळी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here