कासवांचे गाव अशी ओळख असणाऱ्या वेळास समुद्र किनाऱ्यावर वन विभाग आणि ग्रामस्थांनी या सागरी कासवांची अंडी घरट्यांमध्ये सुरक्षित करण्याची शोध मोहीम राबविली आहे. आतापर्यंत पाच घरट्यातील सुमारे ३५० अंडी हॅचेरीत संरक्षित करण्यात आली आहे. कोकण किनाऱ्यावर समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम चालू आहे. कासव हे निसर्ग साखळीतील एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूत अंडी घालते. परंतु काही प्राणी ही अंडी कादन खातात. नशिबाने काही पिल्ले बाहेर आली तर ती समुद्रापर्यंत पोहचतापोहचता पक्षांची शिकार होतात. जी समुद्रात पोहचतात ती पिल्ले आणि कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मरण पावतात. संशोधनानुसार एक हजारामध्ये एक कासव जगते. ह्या सर्वांचा विचार सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांनी केला व कासवांचे संवर्धन करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना ह्या उपक्रमात सहभागी करून घेतले. आज वनखात्याच्या मदतीने हे कार्य अविरत चालू आहे. पहाटे व रात्री कासव मित्र पेट्रोलिंग करत त्या ठिकाणाचा शोध घेतात. रात्रीच्या वेळी भरती रेषेच्यावरती सुरक्षित ठिकाणी वाळूमध्ये एक ते दीड फुट खड्डा करून त्यात अंडी घालतात. रिडलेची मादी अंडी घातल्यानंतर समुद्रात निघन जाते ती कधीच परत येत नाही. अंडी बनवलेल्या संरक्षित भागात आणून ठेवली जातात. पिल्ले बाहेर पडली की त्यांना सुरक्षित समुद्रात सोडले जाते. संख्या वाढल्यानंतर कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा जन्मोत्सव पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
