राजापूर तालुक्यातील प्रसिध्द आणि सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या व समस्त महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या सागवे येथील श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवार १७ जानेवारी रोजी साजरा होत आहे. या यात्रेची जय्यत तयारी सध्या ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आली असून राजापूर, देवगड व विजयदुर्ग आगारातून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना ने आण करण्यासाठी खास यात्रा स्पेशल गाडयांची सोय करण्यात आली आहे.राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा अशी श्री कात्रादेवीच्या यात्रेची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यात्रा काळात दर्शनासाठी भाविक कात्रादेवीत येत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर अगोदरच या यात्रेची तयारी हाती घेण्यात आली होती. येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधांबरोबरच यात्रेत येणारे व्यावसायिक यांना दुकान गाळे व योग्य जागा उपलब्ध करून देणे, जागेची सफाई करणे, रस्त्यांची सफाई व डागजुगी आणि सुशोभिकरण करणे, यात्रास्थळी येणाऱ्या वाहकांची पाकिंग व्यवस्था व वाहतक व्यवस्था करणे यांसारखी कामे ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहेत.
एसटी प्रशासनाकडून यात्रा स्पेशल
या यात्रेसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातन मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात, त्यांना सागवे येथे येण्यासाठी राजापूर, रत्नागिरी, विजयदुर्ग व देवगड आगारातून खास यात्रा स्पेशल एसटी बस सोडल्या जाणार असून त्यासाठी या आगारांनी नियोजन केले आहे. दिवस आणि रात्री या खास यात्रास्पेशल गाडया सुरू रहाणार आहेत. राजापूर एसटी आगारातून राजापूर ते कात्रादेवी मार्गावर सकाळपासून यात्रा संपेपर्यंत जादा गाडया व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच कुंभवडे हरचली, हातिवले, डोंगरतिठा, तारळ, नाणार, कुंभवडे, जैतापूर, तुळसुंदे, अणसुरे, शिरसे, धाऊलवल्ली या भागातून गाडयांची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी या एसटी बसचा फायदा घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले आहे. यात्रास्थळी दरवर्षी प्रमाणे सागवे-गोठीवरे शिवसेना शाखेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा व आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे.
सागवे ग्रामपंचायतीकडून जय्यत तयारी
कातळावर भरणाऱ्या या कात्रादेवी यात्रेसाठी दरवर्षी लाख ते दिड लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून सागवे ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष तयारी हाती घेण्यात आली आहे. यात्रास्थळाची साफ सफाई तसेच या ठिकाणी यात्रास्थळी भाविकांना येण्यासाठी व यात्रा संपल्यानंतर जाण्यासाठी दोन स्वतंत्र एसटी बस डेपो, रिक्षा स्टॅन्ड व खासगी वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.त्याचबरोबर मोठया संख्येने या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापारी व व्यावयासिकांसाठी दुकान गाळयांची सूत्रबध्द आखणी करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दिवाबत्ती, यात्रा परिसरात दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. यात्रास्थळी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून सरपंच मजिद काझी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर यात्रेच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे शिवसेना शाखा सागवे व सागवे ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत प्रथमोपचार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
