महाविकास आघाडी सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे 4234 कोटींचे नुकसान, माजी कृषीमंत्र्याचा आरोप

0

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यानी राजीनामा द्यावा किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील अन्नधान्य तसेच फळ उत्पादक शेतकऱ्यांना 2019 पर्यंत चांगल्यारित्या मिळत होता. मात्र 2019 नंतर राज्य सरकारने विमा कंपन्यांसोबत संगनमत करून जे चुकीचे करार केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा मोठा घात झाल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. 2019 च्या खरीप हंगामामध्ये 1 कोटी 28 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तेव्हा तब्बल 85 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 5 हजार 795 कोटी रुपये मिळाले होते. दुसऱ्या बाजूला 2020 च्या खरीप हंगामात 1 कोटी 38 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढूनही फक्त 15 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी फक्त 974 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे खाजगी विमा कंपन्यांच्या घशात राज्याच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे 4 हजार 234 कोटी रुपये ठाकरे सरकारच्या चुकीमुळे गेल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान फक्त ठाकरे सरकारने विमा कंपन्यांसोबत निकष बदलवल्यामुळे झाल्याचा आरोप करत हे दलालांचे सरकार असून त्यांनी विमा कंपन्यांसाठी दलाली केल्याची टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. खरीप 2020 मध्ये अवकाळी पाउस, चक्रीवादळ अशी अनेक संकट आली आहेत. कापसाचे उत्पादन बोंड अळीमुळे कमी झाले. सोयाबिन हाती आले नाही. बियाण्यांचे प्लॉट सुद्धा खराब झाले. सर्व पिकांची विदारक परिस्थिती असताना सुद्धा विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हात मिळवणी करून फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली असून त्यापैकी फक्त 743 कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने 4 हजार 234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा खरीप 2020 मध्ये मिळाल्याचे आरोप अनिल बोंडे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:13 PM 08-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here